वार्ताहर/ खडकलाट
साहित्य आणण्यासाठी बेंगळूरला जात असताना हुबळी-धारवाड मार्गावर झालेल्या टोयाटा इटांइज व ट्रक अपघातात युवक ठार झाला. तर तिघे जखमी झाले. व्यंकटेश अशोक पाटील (वय 25) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खडकलाट गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील व्यंकटेश पाटील, सुमित सुधाकर पाटील (वय 25), अक्षय रमेश पाटील (वय 25) व गणेश शंकर हेगाण्णा (वय 25) हे चौघे युवक बेंगळूर येथे कामाला आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्यामुळे सदर युवक खडकलाटला आले होते. त्या सर्वांचे बेंगळूर येथे साहित्य होते. ते आणण्यासाठी चौघेजण 7 रोजी टोयाटा वाहनाने बेंगळूरला जात होते.
दरम्यान धारवाडनजीक येताच समोरून जाणारा ट्रक न दिसल्याने कार चालकाचा ताबा सुटून ट्रकला मागून जोराची धडक बसली. यात व्यंकटेश याला गंभीर दुखापत झाली. तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. सर्वांना तात्काळ धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींना धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थेच्या एसडीएम रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असताना 9 रोजी पहाटे व्यंकटेश याची प्राणज्योत मालवली. तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. व्यंकटेश हा एकुलता एक व घरातील कर्ता होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. व्यंकटेश याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.