ड्रग्स माफिया-भाजपा नेत्यांचे संबंध उघड : सीबीआय चौकशी करण्याची आमदार सुदिन ढवळीकरांची मागणी
वार्ताहर / मडकई
चित्रपट अभिनेता कपिल झवेरी हे ड्रग्स माफिया असून त्यांचा काही भाजपा नेत्यांशी संबंध आहे. एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रावरून हे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी पणजीतील एका तारांकीत हॉटेलमध्ये राज्यसभा खासदारांसोबत ते दिसले होते. या ड्रग्स माफिया राजकीय नेत्यांच्या संबंधाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
बांदोडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा नेते व झवेरी यांच्या गाठीभेटीसंबंधीची फोटो सध्या समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. सार्वजनीक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे लिंकही व्हायरल होत आहे. त्यांनी याप्रकरणी पोलीस तक्रारही केली आहे. त्यामुळे हे लोक खंडणी प्रकरणात गुंतलेले आहेत की काय असा संशय घ्यायला वाव आहे. मंत्री पाऊसकर खंडणी प्रकरणात सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कपिल झवेरी यांच्या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने क्राईम ब्रांचने छापा टाकून त्यांना अटक केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे झवेरी यांची छायाचित्रे मुख्यमंत्र्यांसोबतचे प्रसिद्ध झाली आहेत. एका कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळय़ाला आमंत्रण देण्यासाठी ते आले असावे असे मुख्यमंत्री त्यावर स्पष्टीकरण देतात, असे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.
पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर किंवा माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांच्या कारकिर्दीत असे प्रकार कधीच घडले नाहीत. त्यामुळे मगो पक्षाचा त्यामूळे नेता असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. मात्र या उलट कॉग्रेस पक्षाची राजवट व आता भाजपच्या राजवटीने गोव्याच्या भूमीवर असे हीन प्रकार घडू लागल्याने सामाजिक सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या विशेष पथकामार्फत अशा गुन्हय़ांची सखोल चौकशी करण्याची मागणी ढवळीकर यांनी केली आहे.
कॉग्रेस पक्षातील एका युवा कार्यकर्त्याचे ड्रग्स व्यवहारात नाव घेतले जात होते. विधानसभेत हे प्रकरण गाजल्याने चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. माजी मंत्री मिकी पाशेको, माजी आमदार स्व. विष्णू सुर्या वाघ व लवू मामलेदार यांची या समितीवर नियुक्ती केली होती. त्यांनी हा अहवालही तयार केला होता. नंतर भाजपानेच हा अहवाल मागे घेतला. अशा रेव्ह पाटर्य़ांना सरकार परवानगी देऊन गोव्यातील तरुणांचे आयुष्य बरबाद करीत आहे. राज्याचीही सर्वत्र बदनामी होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एका बाजुने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेतल्यास सरकार या आपत्तीबाबत गंभीर दिसत नाही. फर्मागुडीतील तिनही कोरोना निगा केंद्रात रात्रभर खंडित झालेला वीज पुरवठा सकाळपर्यंत पूर्वपदावर आला नव्हता. डांसांच्या उपद्रवामुळे रुग्ण हैराण झाले असून त्यांना अन्य संसर्गजन्य रोग होण्याची भिती ढवळीकर यांनी व्यक्त केली. येथील रुग्णांना नाश्ता व जेवणे वेळेत मिळत नाही. स्वच्छेतेची तर मारामारच आहे. इतर सुविधांही वानवा असल्याचे या रुग्णांच्या तक्रारी आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी दीड दिवसांच्याच्या गणेश चतुर्थी नतंर सरकारने पंधरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करावे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण येण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्यांय असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
ज्या जागेत आयडी इस्पितळत स्थलांतरीत करण्यात आले आहे, त्या दिलासा इस्पितळाचीही स्थिती काही वेगळी नाही. आयएमएला निधी पुरवून येथे वैद्यकीय सुविधांत सुधारणा घडवून आणणे शक्य आहे. फेंडा तिस्क येथून आयडी इस्पितळातील रूग्णांची दिलासामध्ये ने आण करण्यासाठी कदब बससेवा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. एक्सरे मशिन, रक्त चाचणी यासह इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल सत्यपाल मलीक हे सत्यवादी असल्यामुळेच त्यांना गोमंतकीयांची काळजी होती. यांची तडकाफडकी बदली करून सरकार जनतेवर अन्याय करीत आहे. आमदार फोडण्याचा आर्थीक व्यवहार झाला असण्याची शक्यता असून हे वृत्त राज्यपालांना गुप्तचर विभागातून कळले असावे. सरकारचे बिंग फुटण्या आधीच त्यांची बदली करण्याचा घाट घातला गेल्याचा आरोप आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.