अवैध सिलिका माययिंगविरोधात महसूलची कारवाई तीव्र : अनधिकृत वॉशिंग प्लांटच अधिक
कासार्डे परिसरातील मायनिंग
सर्व पडताळणीनंतर कारवाई
कारवाईकडे सर्वांचेच लक्ष
प्रतिनिधी / कणकवली:
तालुक्यातील अवैध सिलिका मायनिंगच्या विरोधात आता महसूल विभागाने कडक कारवाईच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. सिलिका मायनिंग लीज व ट्रेडिंग परवाने पडताळणीच्या अनुषंगाने पाच पथकांकडून मंगळवारी दिवसभर तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांच्यासहीत पाच नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात आली असून सर्व पडताळणीअंती पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, या भागात अधिकृतपेक्षा अनधिकृत वॉशिंग प्लांटची संख्या अधिक असल्याचे पुढे आले असून आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनधिकृत मायनिंग जोरात
कासार्डेसहीत तालुक्याच्या काही भागात मोठय़ा प्रमाणात सिलिका मायनिंग सुरू आहे. यात लीजधारक कमी आणि अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱयांचीच संख्या अधिक असल्याचे समजते. त्याचप्रमाणे ट्रेडिंग परवाने घेतलेल्यांपेक्षा विनापरवाना ट्रेडिंग करणाऱयांची संख्या अधिक आहे. महसूलकडून गेले काही दिवस याबाबतची तपासणी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भागात 40 ते 45 अधिकृत ट्रेडिंगधारक तर 60 ते 65 अनधिकृत असल्याचे समजते.
तपासणीसाठी पाच पथके
दरम्यान, मंगळवारी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा खनिकर्म अधिकारी अजीत पाटील, तहसीलदार आर. जे. पवार, नायब तहसीलदार सुजाता पाटील, एस. व्ही. राठोड, तानाजी रासम, प्रिया हर्णे, श्री. नाईक या अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली एकूण पाच पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरू करण्यात आली आहे. महसूलचे सुमारे 25 हून अधिक अधिकारी कर्मचारी कासार्डे भागात तपासणी करत आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱयांच्या पथकाकडून लीज तर इतर अधिकाऱयांच्या पथकाकडून ट्रेडिंगची तपासणी होत आहे.
कठोर कारवाईची गरज
तालुक्यात सिलिका मायनिंगबाबत सुरू असलेल्या या एकूणच प्रकारात मोठय़ा प्रमाणात शासकीय महसूल बुडविण्यात येत आहे. करोडोंची उलाढाल होत असून प्रशासनाकडून अद्याप दंड वगळता कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांची सिलिका जप्त करणे, फौजदारी दाखल करणे, अनधिकृत प्लांटधारकांवर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन काय पावले उचलणार? याकडे साऱयांचे लक्ष लागून आहे. अनधिकृत वाळूवर कारवाई करताना रॅम्प उद्ध्वस्थ केले जातात. त्यापद्धतीने वॉशिंग प्लांटवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अनधिकृत विजेसह रात्रीचे उत्खनन
उपलब्ध माहितीनुसार, प्रशासनाने कारवाई सुरू केली असली तरीही अद्याप सायंकाळनंतर उत्खनन करून मोठय़ा प्रमाणात वाहतूक केली जात आहे. महसूल यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलल्यानंतरही सुरू असलेल्या या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच या भागात अनधिकृत वीज वापर केला जात असल्याचीही चर्चा आहे. महावितरणकडून पडताळणी केली जाणार असल्याचेही समजते. दुसरीकडे महसूलच्या पथकांकडून तपासणीचे काम सुरू करण्यात आले असले तरीही अद्याप पूर्ण पडताळणी होण्यास काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.