प्रतिनिधी/ कुडचडे
मोले येथे होऊ घातलेल्या तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी पंचायतीने दिलेल्या परवान्याच्या विषयावरून आपल्याविरुद्ध जे दिशाभूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यात कोणतेच तथ्य नसून ही फक्त विरोधी पक्षांची एक चाल आहे. त्यामुळे कोणीच दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन मोलेच्या सरपंच तन्वी केरकर यांनी केले आहे.
सावर्डे येथे गिरीश हॉलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मोलेचे उपसरपंच सुशांत भगत, सांगोल्डा पंच राजू सांगोडकर, मोलेचे पंच समर कदम यांची उपस्थिती होती. सदर परवाना सर्व पंचांजवळ चर्चा करूनच देण्यात आला. कारण सध्या मोले भागात वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीत ग्रामस्थांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. त्यात ऑनलाईन शिक्षणाची बाब समाविष्ट असून पाण्यासाठी लावलेले पंप वारंवार वीज खंडित झाल्यामुळे खराब होतात. यासंबंधी सर्वेक्षण करूनच लोकांच्या हितार्थ हा परवाना देण्यात आला, असे सरपंच केरकर यावेळी म्हणाल्या.
त्याची तसेच सात पंचांची मोले पंचायत स्थिर असल्याची खातरजमा करून देण्यासाठी आपण उपसरपंच व पंचांसह आलो आहेत. याकामी सर्वांना विश्वासात घेतलेले आहे. तरी स्वतःच्या स्वार्थासाठी हा परवाना दिल्याचे सिद्ध केल्यास त्याचवेळी आपण सरपंचपदाचा राजीनामा देऊ, असे केरकर यांनी सांगितले.
आरोप सिद्ध करून दाखवा
तमनार प्रकल्पासाठी दिलेल्या परवान्याच्या विषयावरून सरपंचांविरुद्ध फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सरपंचांनी अन्य पंचांना विश्वासात न घेता सदर परवाना दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबंधी सत्यपरिस्थिती कळावी यासाठी आपल्यासह चार पंचायत सदस्य येथे आलेले आहेत, असे उपसरपंच भगत यांनी सांगितले. राहिला विषय प्रकल्पाचा, तर सदर प्रकल्प हा चांगला आहे व मोलेवासियांना त्याचा भरपूर फायदा होणार असल्यामुळेच हा परवाना देण्यात आला. तो सरपंचांनी सर्व पंचांना विश्वासात घेऊनच दिलेला आहे. जर यात काही खोटारडेपणा लपलेला असेल, तर तो सिद्ध करून दाखवावा. जर सिद्ध झाले, तर अवघ्या पाच मिनिटांत आम्ही सर्व जण राजीनामा देण्यास तयार राहू, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
सरपंचांवर आरोप करताना पंचांना विश्वासात न घेता परवाना दिल्याची टीका केली गेली आहे. अशी कोणतीच गोष्ट घडलेली नसून त्यांनी सर्व पंचांना विश्वासात घेऊनच तो परवाना दिला. त्यांनी जो निर्णय घेतला तो जनहितार्थ घेतला. आमचा सरपंच केरकर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे व आमचे सहकार्य त्यांना कायम राहणार आहे, असे पंच सांगोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.