बसेसची इतरत्र व्यवस्था : फलाट उभारणीच्या कामाला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
बसस्थानकाचा विकास साधण्यासाठी तात्पुरते बसस्थानकही हटविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी बससेवा पुरविली जात होती. मात्र आता बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने प्रवाशांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे आणि तात्पुरत्या स्वरुपात उभारलेले बसस्थानक हटविण्यात आले आहे. या ठिकाणी आता फलाट उभारले जाणार आहेत.
मागील काही वर्षांपासून स्मार्ट सिटी अंतर्गत बसस्थानकाचा विकास केला जात आहे. स्मार्ट बसस्थानकांबरोबर आवारात शौचालये, फलाट आणि व्यापारी गाळे उभारले जाणार आहेत. याकरिता बसस्थानकाच्या आवारात सपाटीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा हा गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेला जोडला गेला आहे. त्यामुळे बसस्थानकात परराज्याच्या प्रवाशांची गर्दीही अधिक असते. त्याबरोबरच गोवा आणि महाराष्ट्राच्या बसदेखील दाखल होत असतात. याकरिता गोवा आणि महाराष्ट्राच्या बससाठी वेगळे फलाट उभारले जाणार आहेत. त्याबरोबरच स्थानिक आणि लांब पल्ल्यांच्या बसचीदेखील वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.
बसस्थानकाचा तब्बल 34 कोटींच्या निधीतून विकास होत आहे. बसस्थानकाबरोबर नवीन फलाट, पिण्याचे पाणी, शौचालये आणि इतर सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी बसस्थानकाच्या आवारातील तात्पुरते बसस्थानक आणि इतर साहित्य हटविले जात आहे. त्यामुळे लवकरच स्मार्ट बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.