ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांचा ‘लूप लपेटा’ हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. हा चित्रपट कॉमेडी थ्रिलर धाटणीचा आहे. कोरोना संकटामुळे तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तापसीने यासंबंधीची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर येणारा हा तापसीचा चौथा चित्रपट ठरणार आहे.
लूप लपेटा हा 1998 मध्ये प्रदर्शित झालेला जर्मनीचा क्लासिक कल्ट चित्रपट ‘लोला रेन्नट’ म्हणजेच ‘रन लोला रन’ (इंग्रजीत)चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट एक्सपेरीमेंटल थ्रिलर स्वरुपाचा असून याचे दिग्दर्शन आकाश भाटिया यांनी केले आहे. भाटिया या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहेत. स्वतःच्या प्रियकराला वाचविण्यासाठी अनेक मार्ग अवलंबिणाऱया युवतीची ही कहाणी असणार आहे.
तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ ‘अन्नाबेल सेतुपति’ आणि ‘रश्मि रॉकेट’ हे चित्रपट थेट ओटीटीवर झळकले होते. तापसीच्या या तिन्ही चित्रपटांचे कौतुक झाले होते. तापसीने अलिकडेच निर्माता म्हणून ‘ब्लर’ चित्रपटाची घोषणा केली आहे.