वृत्तसंस्था/ अन्टाल्या
येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या तिरंदाजपटूंनी मिश्र रिकर्व्ह पेयर विभागात अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दुसरे पदक निश्चित केले आहे.
विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेतील रिकर्व्ह मिश्र पेयर प्रकारात भारताच्या तरुणदीप राय आणि रिद्धी फोर यांनी स्पेनचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पाचवी मानांकित जोडी राय आणि फोर यांनी स्पेनच्या तिरंदाजपटूविरुद्ध सुरुवातीलाच 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर या जोडीने स्पेनचा 5-3 (38-35, 36-39, 38-38, 36-35) अशा चार सेट्समध्ये पराभव केला. आता सुवर्णपदकासाठी रिकर्व्ह मिश्र सांघिक पेयर प्रकारात भारताची गाठ ब्रिटनबरोबर रविवारी होणार आहे.
या स्पर्धेत गुरुवारी भारताच्या पुरुष आणि महिलांच्या रिकर्व्ह संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी यांनी अंतिम फेरी गाठली असून त्यांची सुवर्णपदकासाठीची लढत शनिवारी फ्रान्सबरोबर होणार आहे. कंपाऊंड मिश्र पेयर विभागात भारताच्या अभिषेक वर्मा आणि मुस्कान किरार यांचा शनिवारी क्रोएशियाबरोबर कांस्यपदकासाठी सामना होईल. या क्रीडा प्रकारात वर्मा आणि मुस्कान यांना उपांत्य लढतीत स्लोव्हेनियाच्या जोडीकडून 156-157 अशी हार पत्करावी लागली.