कागल / प्रतिनिधी
कागल पोलीसांनी चेनस्नॅचिंग प्रकरणात तिघा संशयीत चोरटयांना अटक केली आहे. त्यांनी मोटरसायकल चोरीचे पाच आणि चेनस्नॅचिंगचे दोन गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. पोलीसांनी त्यांच्याकडून पाच मोटरसायकलीसह दोन सोन्याची मंगळसूत्र जप्त केली आहेत.
कागल पोलीसांनी चेनस्नॅचिंग प्रकरणी वंदूर येथील लखन कृष्णात माने आणि कराड मधील आबासो अरूण तारळेकर यांना अटक केली होती. तसेच संकेश्वर येथील मल्लेशगोंडा ऊर्फ विनायक पाटील यालाही मोटरसायकल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलीसांनी तिघा संशयीत आरोपिकडे कसून चौकशी केली. यावेळी लखन माने याने सांगली, पंढरपूर, संकेश्वर येथून तीन मोटरसायकली चोरी केल्याचे तसेच करवीर तालुक्यातील शेळकेवाडी – म्हये दरम्यानच्या रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लाबविल्याची कबुली दिली.
मल्लेशगोंडा पाटील या संशयीत आरोपीनही दोन मोटरसायकली चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे . पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली आणि दोन सोन्याची मंगळसूत्र जप्त केली आहेत. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौकरे, पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी, निखिल कर्चे, पोलीस हवलदार विजय पाटील, पोलीस नाईक पोपट गावित, अनंत कोंडरे आणि राजू सावंत यांनी ही कारवाई केली.