बुधवारी 27 रुग्णांची भर : बाधितांची संख्या 560 वर : बायणा, सडा नवे कंटेनमेंट झोन
प्रतिनिधी / पणजी
तीन पोलीस कॉन्स्टेबल कोरोनाबाधित झाले असून काल बुधवारी एकूण 27 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गोव्यातील बाधितांची संख्या 560 एवढी झाली आहे. बुधवारी 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कुठ्ठाळी येथील एक खाजगी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्वरी येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मांगोरहिल येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 294 एवढी झाली आहे. मांगोरहिलशी संबंधित प्रकरणे 172 आहे. न्युवाडे येथील रुग्णसंख्या 13 आहे. बायणा 29, सडा येथे 23 बाधित आहेत. मोर्ले सत्तरीतील रुग्णसंख्या 19 तर चिंबल येथील रुग्णसंख्या 14 झाली आहे.
बुधवारी एकूण 1949 चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 1353 जणांचे अहवाल नकारात्मक आले. 569 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. वास्कोतील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. विमान, रेल्वे, रस्ता मार्गे गोव्यात आलेल्या रुग्णांची संख्या 74 एवढी आहे.
मुरगाव, वास्को स्थानकात 3 कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह
मुरगाव पोलीस स्थानकातील 2 पोलीस कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह ठरले आहेत. वास्को स्थानकातील एकास बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्ही पोलिसांचे नातेवाईक व त्यांच्याशी संपर्कात आलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर कुठ्ठाळी येथील जो डॉक्टर बाधित आढळला आहे त्याच्याशी संपर्कात आलेल्यांचाही शोध सुरू आहे. वास्को आणि मुरगावात सध्या कोरोनाची दहशत वाढली आहे.
बायणा, सडा नवे कंटेनमेंट झोन जाहीर
वास्कोत बायण व सडा हे भाग कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने तेथील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत बायणात 29 कोरोना बाधीत आढळून आलेले असून सडय़ावरील कोरोना बाधितांची संख्या 23 झालेली आहे.
पैठण-पर्वरीत पहिला कोरोनाबाधित
प्रतिनिधी / पर्वरी
साल्वादोर-दु-मुन्दु पंचायतक्षेत्रातील पैठण-पर्वरी येथे भाडेपट्टीवर राहणाऱया 65 वर्षीय वृद्धास कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्याने कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पर्वरीतील हा पहिला रुग्ण ठरला आहे. त्याच्या कुटुंबियांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
सदर इसम संजयनगर येथे मुलाकडे राहण्यासाठी आला होता. त्याची चाचणी केली असता पोझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्याला दम्याचा त्रास असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्याची मुलगी पैठण-साल्वादोर-दु-मुन्दु येथे राहत असून ते मुलीच्या घरीही गेले होते. संजयनगर व पैठण हे दोन्ही भाग साल्वादोर-दु-मुंद पंचायतक्षेत्रात येतात.
सरपंच संदीप साळगावकर यांनी ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो, पैठण पाटो व साल्वादोर-दु-मुन्दु येथील पाटो रस्त्यावर नेहमीच संध्याकाळच्या वेळी लोकांची गर्दी असते. याबद्दल सरपंच साळगावकर यांनी पर्वरी पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देऊन नियंत्रण ठेवण्याची विनंती केली होती. पर्वरीतील हाय विलाज येथे काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या महिलेची चाचणी केल्यानंतर तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण लपवून ठेवले अशी चर्चा नागरिकांत चालू होती.