65 वर्षांच्या सहजीवनाची एकत्र अखेर : वाडोस येथील घटना : पत्नीच्या वियोगाने पतीचेही निधन
अजित परब / दुकानवाड:
एकमेकांच्या साथीने सुनंदा राजाराम सावंत (78) व राजाराम गुंडू सावंत (81) या दाम्पत्याने सहजीवनाची पासष्ट वर्षे व्यतीत केली.. आयुष्यात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले.. सुख-दु:खांना सामोरे गेले.. शुक्रवारच्या दुपारी सुनंदा यांनी अचानक अखेरचा श्वास घेतला.. पत्नीच्या वियोगाचा हा धक्का राजाराम पचवू शकले नाहीत.. ते पार कोलमडलेच.. त्याच क्षणी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.. ही घटना आहे कुडाळ तालुक्यातील वाडोस-देऊळवाडी येथील.. या दाम्पत्याने शुक्रवारी दुपारी एकापाठोपाठ या जगाचा निरोप घेतला.. या घटनेने अख्खे गाव हळहळले.
वाडोस-देऊळवाडी येथे सुनंदा सावंत व राजाराम सावंत हे वृद्ध दाम्पत्य परिवारासह राहायचे. राजाराम हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावून वाडोस शाळेतून निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी सुनंदा यांनी घरची जबाबदारी सांभाळत पतीला साथ दिली. दोघांचीही एकमेकांना कायम साथ राहिली. सेवानिवृत्तीनंतर राजाराम परिवारात रमले होते. सुनंदा या गेली तेरा वर्षे गुडघ्याच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांची सर्व सेवा राजाराम व त्यांचे कुटुंबीय करायचे.
दुपारचे जेवण एकत्रच घेतले
शुक्रवारी दुपारी या दाम्पत्याचा मुलगा संतोष हे कामानिमित्त पत्नीसह वसोली येथे गेले होते. घरी फक्त त्यांची दोन मुले व हे दाम्पत्य होते. दुपारचे जेवण या दाम्पत्याने एकत्रच घेतले. नंतर ते दोघेही त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. खोली आतून बंद होती.
नात चहासाठी उठवायला गेली अन्..
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची नात चहासाठी त्यांना उठवायला गेली. पण आतून काही प्रतिसाद मिळेना. म्हणून आजोबांकडील मोबाईलवर तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण उत्तर मिळेना. मग तिने शेजारी जाऊन याबाबत कल्पना दिली. तसेच बाहेरगावी गेलेल्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क साधून याबाबत कल्पना दिली.
कुटुंबियांना शोक अनावर
संतोष सावंत यांनी लगेच घरी धाव घेतली. आई-वडील ज्या खोलीत होते, त्या खोलीचा आतून बंद असलेला दरवाजा त्यांनी उघडला. तेव्हा सुनंदा यांचे निधन झाल्याचे आणि त्यांच्या देहावरच मान ठेवत राजाराम यांनी त्यांच्यापाठोपाठ या जगाचा निरोप घेतल्याचे हृदयद्रावक दृश्य निदर्शनास आले. एकाचवेळी त्या दोघांचे निधन झाल्याचे पाहून कुटुंबियांना शोक आवरता येईना.
साऱयांचेच डोळे पाणावले
दरम्यान, गावात या घटनेची माहिती मिळताच लोकांनी तेथे धाव घेतली. सावंत कुटुंबियांना धीर दिला. या घटनेने साऱयांचेच डोळे पाणावले.
सावंत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ओरोस येथील ग्राहक तक्रार निवारण कार्यालयातील स्टेनो अवधूत सावंत व वाडोस येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांचे ते आई-वडील होत. वाडोस स्मशानभूमीत या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.