कुर्डुवाडी / प्रतिनिधी
माढा तालुक्यात सुमारे ५५ स्वॅब घेणारे असताना तपासणी एवढ्या कमी कशा? नियोजनात अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत असून कामाचे योग्य नियोजन करा दररोज सुमारे दोन ते अडीचहजार लोकांची कोरोना चाचणी करा मोबाइल व्हॅन फिरवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात ग्रामसमिती नेमली असून आकुलगाव येथील ग्रामसमीती कशाप्रकारे काम करते याचा आढावा घेण्यासाठी आकुलगाव ता.माढा येथे प्रथम भेट देऊन आवश्यक त्या सूचना तेथील ग्रामसमितीला केल्या . त्यानंतर कुर्डुवाडी येथील शासकीय महिला वस्तीगृह येथील कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन रुग्णांना कोणता औषधोपचार दिला जातो, औषध गोळ्या,आक्सीजन ,रुग्णवाहीका उपलब्ध आहे का याची विचारपूस संबंधित विभागाकडे केली. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, नायब तहसीलदार रवीकिरण कदम ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजी थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, सरपंच जयश्री बोबडे,माजी सरपंच दत्तात्रय जगताप,यांचेसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक गावात लहान मुलांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात १३ विविध रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोविड उपचार सुविधा करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी लागणारे छोटे मास्क, औषधे याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. होम आयसोलेशन पद्धत बंद करण्यात आली आहे.यापुढे बाधित रुग्ण बाहेर दिसताच त्याला सोलापूर केगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.तसेच रुग्णवाहीकेसाठी चालकाची कमतरता असल्यास इतर विभागात अतिरिक्त असलेल्या चालकांची नियुक्ती रुग्णवाहिकेवर करण्याच्या सूचना प्रांताधिकारी ज्योती कदम यांना केल्या.