कराडच्या पाचवड फाटय़ावरील घटना, हल्लेखोर गजाआड
प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील भैरवनाथ ऍटो वर्कशॉप व सुरक्षा ऍटोमोबाईल दुकानातील कामगाराचा डोक्यात लाकडी दांडक्याचे घाव घालून खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. रवि अशोक यादव (वय 27, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. पाचवड फाटा, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. रविचा खून करून पसार झालेल्या रामप्रसाद उर्फ रामू परमेश्वर गोस्वामी याला कराड ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. दरम्यान, याप्रकरणी राहुल मोहन यादव (रा. कालेटेक, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहुल यादव यांच्या मालकीचे भैरवनाथ गॅरेज व सुरक्षा ऍटोमोबाईल हे दुकान पाचवड फाटा येथे आहे. या दुकानात रवि अशोक यादव हा गेल्या चार महिन्यांपासून कामाला असून तो दुकानातच राहतो. 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल यादव दुकान बंद करण्याच्या गडबडीत असताना कामगार रवि दुकानाच्या शेजारी राजस्थानी बेकरीसमोर खुर्चीवर बसला होता. त्यावेळी संशयित रामप्रसाद गोस्वामी तेथे बर्फ फोडण्याचे लाकडी दांडके घेऊन आला. त्याने लाकडी दांडक्याचे घाव रविच्या डोक्यात घालायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने रवि खुर्चीवरून रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. हा प्रकार पाहून दुकानमालक राहुल यादव, चैतन्य कांबळे, दिनेश भाटी घटनास्थळाकडे धावले. तोपर्यंत हल्लेखोर जवळच्याच साईबालाजी हॉटेलात पळाला होता. राहुल यादव यांच्यासह अन्य दुकानदारांनी जखमी रविला खासगी गाडीतून कृष्णा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी तो मृत झाल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांनी संशयिताला तासाच्या आत अटक केली.
पाण्याच्या मोटरचा वाद
मृत रवि आणि हल्लेखोर यांच्यात पाण्याची मोटर बंद करण्यावरून वाद झाल्याचे तपासात समोर येत आहे. यावरून त्यांच्यात धुसफूस झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. यातूनच हल्लेखोराने बर्फ फोडण्याचे दांडके डोक्यात घालून खून केला.