उदयनराजेंच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष जीगरबाज पाठपुरावा
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी मिशन शाहू कला मंदिर व कमानी हौदात थुईथुई कारंजे उडविण्याची मोहिम अखेर फत्ते केली.
शिवजयंतीच्या मुहुर्तावर शाहू कला मंदिर सुरू झाल्याने अभिनेते प्रशांत दामले व कविता लाड अभिनेत्री एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा आनंद रसिकांनी लुटला. गुरूवार पेठेतील ऐतिहासिक कमानी हौदात स्वच्छता झाल्यानंतर पाण्याची थुईथुई उडणारी कारंजी पाहून सातारकरांच्या चेहऱयावर समाधान पसरले. या दोन्ही कामांच्या पूर्णत्वात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दररोज चार तास गेल्या दहा दिवसांपासून अक्षरशः गुंतवून घेतले. शाहू कला मंदिराचे नूतनीकरण गेल्या सहा महिन्यापासून रडतखडतच चालले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहू कला मंदिर सुरू करण्याचे आदेश दिल्यावर उपनगराध्यक्षांनी ठेकेदार बिगारी तसेच पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली. छोटय़ा-मोठय़ा कामांचे नियोजन ठरवत त्यांनी कामाला गती दिल्याने शाहू कला मंदिर मोठय़ा दिमाखात सातारकर रसिकांच्या सेवेत रूजू झाले. उदयनराजे भोसले यांनी शाहू कला मंदिराच्या अद्ययावत सुविधांची पाहणी करून उपनगराध्यक्षांचे तत्पर कामाबद्दल विशेष कौतुक केले. त्यामुळे शुक्रवारी रात्री प्रशांत दामले यांच्या नाटकाचा रात्री चांगलाच खेळ रंगला.
ऐतिहासिक कमानी हौदाची स्वच्छता सुध्दा उपनगराध्यक्षांच्याच पुढाकाराने झाली. सलग चार तास सफाई कामगारांसमवेत उभे राहून मनोज शेंडे यांनी कमानी हौदातून दहा ट्रक्टर गाळ काढला. तब्बल दहा वर्ष बंद असलेले कमानी हौदाचे कारंजे पुन्हा शिवजयंतीच्या दिवशी सुरू झाले. उपनगराध्यक्षांचा कामाचा झपाटा या निमित्ताने दिसून आला. या दोन्ही कामांच्या पूर्णत्वाबद्दल सतर्क सातारकर मंचच्या वतीने मनोज शेंडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.