वार्ताहर/ निपाणी
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्यावर जाणाऱया दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱया अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. अमर सदाशिव कुरळूप्पे (वय 40 सध्या रा. गोकूळ शिरगाव मूळगाव अकोळ) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अमर कुरळूप्पे हा अकोळ गावचा रहिवाशी नोकरीच्या निमित्ताने गेल्या कांही वर्षापासून कुटुंबियांसोबत गोकूळ शिरगाव येथे राहत होता. शनिवारी दुपारी तो सुतगिरणीतील काम आटोपून सेवारस्त्यावरुन दुचाकीने घरी येत होता. याचवेळी नरसिंह सर्व्हीसींग सेंटरनजीक येताच अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यावेळी तो खाली कोसळला. वाहनाचे मागील अंगावरुन गेल्याने तो जागीच ठार झाला.
अपघातानंतर सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर रात्री अकोळ या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. अकोळ येथील निवृत्त मुख्याध्यापक विलास कुरळूप्पे व कोल्हापूर बीएसएनएलचे पर्यवेक्षक काकासो कुरळूप्पे यांचे ते भाचे होत. उत्तरकार्य 6 रोजी सकाळी 9 वाजता अकोळ येथे आहे.