बँकिंग समभागांची मजबूत विक्री – निफ्टीत 142 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण राहिले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 584 अंकांच्या वाढीसोबत बंद झाला आहे. या अगोदर 3 मार्च रोजी निर्देशांक 51 हजाराचा टप्पा गाठत बंद झाला आहे. सत्रात सकाळच्या दरम्यान आशियातील बाजारांमध्ये 273 अंकांची मजबूत वाढ राहिली होती.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीवर बीएसई सेन्सेक्स 584.41 अंकांनी वधारुन निर्देशांक 51,025.48 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142.20 अंकांच्या वाढीसोबत निर्देशांक 15,098.40 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया दिवशी गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी केली आहे. मंगळवारच्या व्यवहारात निफ्टी बँकेचा निर्देशांक 589 अंकांनी वाढून 35,865.65 वर बंद झाला असून यामध्ये कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग 3 टक्क्यांनी वधारले होते. आयसीआयसीआय बँकेचे समभाग 2.6 टक्क्यांनी तर माइंडट्रीचे समभाग 4 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला धातू निर्देशांक 2.51 टक्क्यांनी घसरुन 3,802.70 वर बंद झाला आहे.
एलकेपी सिक्युरिटीजच्या वरिष्ठ टेक्निकल ऍनालिस्टच्या माहितीनुसार मोठय़ा चढउताराच्या सत्रात निफ्टी सकारात्मक कल नोंदवत बंद झाला आहे. बीएसईमधील 3.193 समभागांमध्ये व्यवहार झाले असून यातील 1,264 समभाग वाढीसोबत आणि 1,264 मध्ये घसरणीसह बंद झाले आहेत.
अन्य घडामोडी
अमेरिकेतील बाजारांमध्ये चढउताराचा कल राहिला होता, याचा परिणाम जगातील अन्य देशांमधील बाजारावर राहिला होता. जपानचा निक्कीचा निर्देशांक 280 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. यासह हाँगकाँगचा बाजार हा 157 च्या वाढीसोबत 28,698 वर बंद झाला असून ऑस्ट्रेलियातील ऑल ऑर्डिनरीजचा निर्देशांक हलकीशी वाढ नोंदवत बंद झाला आहे.