प्रतिनिधी/ सातारा
गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदानाच्या मागणीसाठी भाजपा, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुती आक्रमक झाली आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास दि. 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याबाबतचे निवेदन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे तसेच शहर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱयांना कोणताही दिलासा नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱयांची अवस्था दयनीय झाली आहे. या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध 15 ते 16 रु. दराने खरेदी केल्या जात आहे.
त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकयांना व दुध उत्पादकांना शासनाने वायावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो 50 रु अनुदान, शासनाकडून 30 रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्यासाठी सर्व शेतकरी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.