ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकन कंपनी ‘नोवाव्हॅक्स’ आणि भारतातील ‘सीरम’ इन्स्टिट्यूट ‘कोव्होवॅक्स’ लसीची निर्मिती करत आहेत. देशातील 19 ठिकाणांवर नुकतीच या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून, सप्टेंबरपर्यंत ही लस लसीकरणासाठी उपलब्ध होईल. ‘सीरम’चे प्रमुख आदर पूनावाला यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
पूनावला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘नोवाव्हॅक्स’सोबत संयुक्त भागीदारीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोव्होवॅक्स’ लसीची निर्मिती करत आहे. ब्रिटन आणि आफ्रिकेतील नवीन स्ट्रेनवरही या लसीची चाचणी करण्यात आली आहे. नवीन स्ट्रेनवर ही लस जवळपास 89 टक्के प्रभावी ठरली आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ही लस 96.4 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.