बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना तितक्याच प्रमाणात कोरोना चाचण्या देखील होणे आवश्यक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना चाचणी करणाऱ्या पहिल्या पाच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये कर्नाटकचा समावेश आहे. कर्नाटक कोरोना चाचणी मध्ये देशात पाचव्या स्थानी आहे. ताज्या अहवालानुसार, राष्ट्रीय सरासरीच्या ३७,६०२ (सप्टेंबरपर्यंत) च्या तुलनेत प्रति दशलक्ष लोकांमागे ५१,४१९ चाचण्यांची राज्यात नोंद झाली आहे.
कोरोना चाचणीमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून ९१,१७३ कोरोना चाचण्या केल्या जातात. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश ( ८०,११७), तामिळनाडू (७०,७७६) आणि केरळ (५३,९५३) आणि यांनतर कर्नाटकाचा नंबर लागतो.
वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी, दररोज एक लाख कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य कार्यरत आहे. तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाच्या माहितीनुसार कर्नाटकात बुधवारी ७०,३२२ चाचण्या घेण्यात आल्या. राज्यात आजपर्यंत एकूण ३५,३१,४४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.