जुळय़ा बहिणींनी वाढदिवशी मुलींना दिला जन्म
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क
अमेरिकेच्या फोर्ट सेंडर्स रिजनल हॉस्पिटलमध्ये जुळय़ा बहिणींनी स्वतःच्या वाढदिवशी एकाचवेळी दोन मुलींना जन्म दिल्याने हा दिवस अत्यंत विशेष ठरला आहे. या जुळय़ा बहिणींची नावे ऑटम शॉ आणि अंबर ट्रेमोंटेना अशी आहेत. तर त्यांच्या नवजात मुलींची नावे चार्ल्सटन आणि ब्लॅकली ठेवण्यात आली आहेत. हॉस्पिटलने स्वतःच्या फेसबुक पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
आज आमचा आनंद दुप्पट झाला आहे आणि आमचे प्रेमही. चालू आठवडय़ातील हा दिवस आमच्यासाठी अत्यंत खास आहे. दोन जुळय़ा बहिणींनी मुलींना जन्म दिला आहे. या दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन, असे रुग्णालयाने म्हटले आहे.
जुळय़ा बहिणींनी एकत्रित प्रसूतीचे नियोजन केले होते. एकाच महिन्यात दोन मुलांना जन्म देऊ असे वाटत होते. परंतु एकाचवेळी त्यांचा जन्म होईल असा विचारही केला नव्हता, असे उद्गार ऑटम आणि अंबर यांनी काढले आहेत.
स्वतःचा जन्मदिवस आता या मुलींसोबत साजरा करता येणार असल्याचा आनंद या बहिणींना आहे. माझ्या 45 वर्षांच्या कारकीर्दीत अशी घटना पाहिली नव्हती. हे माझ्यासाठी अद्भूत आहे, असे उद्गार डॉ. जॉर्ज विक यांनी काढले आहेत.