ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) डिब्रूगडने ओमिक्रॉन संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचणी किट विकसित केले आहे. ज्याद्वारे केवळ दोन तासांत ओमायक्रॉनचे निदान होईल. सध्या ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी जीनोम सीक्वेन्सिंग करावे लागते. त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागतो.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. हा व्हेरिएंट घातक नसला तरी दहापट स्प्रेडर असल्याने त्याचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्या जलद तपासणीची चिंता सर्वांनाच होती. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च डिब्रूगडमधील शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनच्या जलद चाचणीसाठी एक किट विकसीत केले आहे. ज्याद्वारे केवळ दोन तासात ओमायक्रॉनचे निदान होईल.
डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांच्या नेतृत्वाखालील आयसीएमआर शास्त्रज्ञांनी हे चाचणी किट विकसित केले असून ते 100 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे किट खाजगी-सार्वजनिक भागीदारीअंतर्गत पूर्णपणे भारतात तयार केले जाईल. आयसीएमआरने कोलकाता स्थित कंपनी जीसीसी बायोटेकला याचे कंत्राट दिले आहे.
दरम्यान, भारतात आतापर्यंत 33 रुग्णांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. तर अनेक संशयित रुग्णांचे जीनोम सिक्वेन्स्ंिाग अहवाल प्रतीक्षेत आहेत.