नऊ महिला, चालक, क्लिनरचा मृतात समावेश: टिप्परची मिनीबसला धडक : सर्व मृत दावणगेरे जिल्हय़ातील
वार्ताहर/ हुबळी
एकाच शाळेत शिकलेल्या बालपणापासूनच्या मैत्रिणीवर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर धारवाड बायपासवरील इटीगट्टी येथे घडली आहे. मकर संक्रांतीनिमित्त गोव्याला पर्यटनासाठी जात असताना मिनीबस आणि टिप्पर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी झाले. सर्व मृत दावणगेरे जिल्हय़ातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, दावणगेरेच्या सेंट पॉल्स कॉन्व्हेंट स्कूलच्या एकाच वर्गातील 17 माजी विद्यार्थिनी मिनीबसने गुरुवारी गोव्याकडे निघाल्या. मकर संक्रांतीनिमित्त सुटी असल्याने त्यांनी पर्यटनाचा बेत आखला होता. त्याकरिता त्या गुरुवारी रात्री उशिरा दावणगेरेहून निघाल्या होत्या. याचवेळी बेळगावहून एम सॅन्डची वाहतूक करणाऱया टिप्परने मिनीबसला समोरून धडक दिली. या दुर्घटनेत 9 महिलांचा आणि मिनीबस चालक, क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींवर हुबळीतील खासगी इस्पितळात उपचार सुरू
डॉ. प्रीती रविकुमार (वय 46), परमज्योती हुनचूर (वय 47), राजश्री बंडेम्मनावर (वय 46), डॉ. वीणा मट्टीहळ्ळी (वय 47), वर्षिता बिरादार (वय 46), मंजुळा जे. बी. (वय 47), क्रिरा पोराळ (वय 21), हेमलता उर्फ मानसी (वय 48), मिनीबस चालक राजू गोरबन्नावर (वय 37), रजनी (वय 47) क्लिनर मल्लिकार्जुन उडगट्टी (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण दावणगेरे जिल्हय़ातील आहेत. मृतांमध्ये डॉक्टर, डॉक्टरांच्या पत्नी, शिक्षिका अधिकजण आहेत. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मृत महिलांपैकी डॉ. प्रीती रविकुमार या माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गुरुसिद्धनगौडा यांच्या स्नुषा आहेत. तर परमज्योती या माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांच्या बहिणीच्या स्नुषा आहेत. अपघातात आशा बेतूर, वेदा मंजुनाथ, उषाराणी रमेश, पुर्णिमा रमेशबाबू, प्रविणा प्रकाश आणि टिप्पर चालक बसवराज काद्रोळ्ळी हे जखमी झाले आहेत. टिप्परचालक उगरखोड ता. कित्तूर येथील रहिवासी आहे.
अपघातात मिनीबसचा चक्काचूर
पहाटेची वेळ असल्याने धारवाड बायपासवर रहदारी अत्यंत विरळ होती. त्यामुळे मिनीबस आणि टिप्पर भरधाव होती. यावेळी टिप्पर चालकाने वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरच्या बाजूने येणाऱया मिनीबसला धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात मिनीबसचा चक्काचूर झाला. समोरील आसनांवर बसलेल्यांपैकी कोणीही वाचू शकले नाही. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच धडपड करावी लागली. मिनीबसवर टिप्परमधील एम सॅन्ड पडल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली.
अपघातानंतर मृतदेह धारवाड जिल्हा इस्पितळ आणि हुबळीतील किम्समध्ये विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांनी इस्पितळांकडे धाव घेतली. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेने दावणगेरेत हळहळ व्यक्त होत आहे.