केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गोवा सरकारला आदेश
प्रतिनिधी / पणजी
नवा मोटर वाहन कायदा कोणत्याही परिस्थितीत आहे, तसाच लागू करा, असा आदेश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गोवा सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी होणाऱया महत्वपूर्ण बैठकीत गोव्याचे परिवहनमंत्री माविन गुदिन्हो यांनी हा प्रस्ताव पुन्हा एकदा आणण्याचे ठरविले आहे.
गडकरी यांनी काल मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत देशातील सर्व राज्यांच्या परिवहनमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत विविध विषय चर्चेला घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्व राज्यांना नव्या मोटर वाहन कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली.
परिवहनमंत्री माविन गुदिन्हो यांनी आतापर्यंत दोन वेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर प्रस्ताव मांडला होता. तथापि निवडणूक वर्ष असल्याने यावर आता निर्णय नको असे निवेदन करून बहुतेक मंत्र्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. गुदिन्हो यांनी नव्या मोटर वाहन कायद्यातून गोव्याला सूट देण्यात यावी, किंवा दंडात्मक कारवाई कमी करावी अशी केलेली मागणी गडकरी यांनी फेटाळून लावली. त्यांनी सांगतिले की संपूर्ण देशभरात हा कायदा लागू करणे बंधनात्मक आहे, आणि सर्व राज्यांनी तो लागू केलाच पाहिजे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होत असून या बैठकीसमोर मंत्री माविन गुदिन्हो नव्याने हा प्रस्ताव मांडतील. केंद्रातून कोणतीही सूट मिळणे कठीण आहे, त्यामुळे केवळ गुजरात पॅटर्न लागू करणे हाच एक अंतिम पर्याय राहिला आहे.