वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेत पाकवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने पाकचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. 4 बळी टिपणाऱया न्यूझीलंडच्या टीम साऊदीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 19.2 षटकांत 1 बाद 164 धावा जमवित हा सामना 4 चेंडू बाकी ठेवून 9 गडय़ांनी जिंकला.
पाकच्या डावात मोहम्मद हाफीजने दमदार फलंदाजी करत 57 चेंडूत नाबाद 99 धावा झळकविल्या. टी-20 प्रकारातील हाफीजची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने टी-20 प्रकारात 98 धावा झळकविल्या होत्या. हाफीज शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिल्याने पाकला 163 धावापर्यंत मजल मारता आली. डावातील शेवटच्या षटकांत हाफीजने 1 षटकार, एक चौकार आणि तीन एकेरी धावा घेत एकूण 13 धावा जमविल्या. त्याने या षटकांतील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला पण टी-20 प्रकारातील त्याचे पहिले शतक मात्र केवळ एका धावेने हुकले.
पाकच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. टीम साऊदीच्या भेदक माऱयापुढे पाकचा निम्मा संघ केवळ 39 धावांत तंबूत परतला होता. साऊदीने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्या हप्त्यात 3 षटकांत 16 धावांत 3 गडी बाद केले होते. बोल्टच्या पहिल्याच षटकांत पाकच्या मोहम्मद रिझवानने 2 चौकार तर हैदर अलीने साऊदीच्या पहिल्या षटकांतील दुसऱया चेंडूवर षटकार मारला पण त्यानंतर साऊदीच्या स्विंग गोलंदाजीसमोर पाकचे हैदर अली आणि अब्दुला शफीक हे केवळ दोन चेंडूच्या अंतराने बाद झाले. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 16 अशी होती. मोहम्मद रिझवानने 20 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या पण तो साऊदीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सिफर्टकरवी झेलबाद झाला. कर्णधार शादाब खान नीशमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हाफीजने खुशदील शहासमवेत पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भागिदारीं केली. शहाने 14 तर अश्रफने 4 धावा जमविल्या. हाफीज आणि इमाद वासीम यांनी सातव्या गडय़ासाठी अभेद्य 44 धावांची भागिदारी केली. इमाद वासीम 10 धावावर नाबाद राहिला. हाफीजने टी-20 प्रकरातील आपले 14 वे अर्धशतक 37 चेंडूत झळकविले. न्यूझीलंडतर्फे साऊदीने 21 धावांत 4 तर नीशम आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडची सलामीची जोडी गुप्टील आणि सीफर्ट यांनी 11 चेंडूत 35 धावांची भागिदारी केली. पाकच्या अश्रफने गुप्टीलला बाद केले. त्याने 11 चेंडूत 21 धावा जमविल्या. सीफर्ट आणि कर्णधार विल्यम्सन यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 129 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 4 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. सीफर्टने 63 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 84 तर कर्णधार विल्यम्सनने 42 चेंडूत नाबाद 57 धावा झोडपल्या. या मालिकेतील सीफर्टचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. या सामन्यात सीफर्टने आपले अर्धशतक 32 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. 10 षटकांत न्यूझीलंडची स्थिती 1 बाद 91 अशी होती तर 10 षटकांत पाकने 4 बाद 65 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडला शेवटच्या षटकांत 5 धावांची जरूरी होती. या षटकांतील दुसऱया चेंडूवर कर्णधार विल्यम्सनने चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने टी-20 प्रकारातील 12 वे अर्धशतक 37 चेंडूत झळकविले होते. काही दिवसापूर्वी हॅमिल्टनच्या मैदानावर पकविरुद्धच्या कसोटी सामन्यात विल्यम्सनने 251 धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव- 20 षटकांत 6 बाद 163 (मोहम्मद हाफीज नाबाद 99, रिझवान 22, शादाब खान 14, इमाद वासीम नाबाद 10, साऊदी 4-21, नीशम 1-10, सोधी 1-21). न्यूझीलंड 19.2 षटकांत 1 बाद 164 (सीफर्ट नाबाद 84, विल्यम्सन नाबाद 57, गुप्टील 21, अश्रफ 1-19).