ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी उशिरा अटक केली. पंजाबमधील ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली. काही दिवसांपूर्वी चन्नी यांच्या नातेवाईकांवर छापे टाकून चौकशी केली होती.
दरम्यान, गेल्या महिन्यात, ईडीने पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब, पठाणकोट येथे हनी आणि इतरांच्या निवासस्थानी छापे टाकून झडती घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या झडतीनंतर १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्यानंतर त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १० कोटींपैकी ७.९ कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आले, तर अन्य संशयित संदीप सिंगच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात असे समोर आले आहे की भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कंपनीची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर, कुदरतदीप सिंह यांच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. वाळूच्या खाणीचे कंत्राट मिळवण्यासाठी काळा पैसा गुंतवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. कंपनी छोटी असल्याने त्या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट मिळण्याची शक्यता नाही.