गुरु रविदास जयंतीचे कारण राजकीय पक्षांनी केले पुढे
चंदीगड / वृत्तसंस्था
पंजाबमधील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंजाबमध्ये 14 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, 16 फेबुवारी रोजी गुरु रविदास जयंती असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य भक्तगण वाराणसीला जाण्याची शक्यता असल्यामुळे 14 ला होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भाजप, पंजाब लोक काँग्रेस पार्टी आणि संयुक्त शिरोमणी अकाली दलानेही मतदानाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. सर्व पक्षांनी आयोगाला वेगवेगळी पत्रे पाठवली आहेत. 14 रोजी मतदान झाल्यास अनेक मतदार आपल्या अधिकार-हक्कापासून वंचित राहतील, असा दावा करण्यात आला आहे.