वृत्तसंस्था/ होबार्ट
यजमान ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव करत ऍशेस स्वतःकडे राखले. या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 146 धावांनी पराभव करत खेळाचे दोन दिवस बाकी असताना विजय नोंदविला.
या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 271 धावांचे आव्हान दिले होते. रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी शेवटच्या सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव 124 धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे क्रॉले आणि बर्न्स यांनी सलामीच्या गडय़ासाठी 68 धावांची भागिदारी केली. इंग्लंडची ही जोडी फुटल्यानंतर त्यांचे उर्वरित 9 गडी 56 धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने 18 धावांत 3 तर ग्रीनने 21 धावांत 3 गडी बाद केले. हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर बोलँड आणि ग्रीन यांनी 6 गडी बाद करून आपल्या संघाला खेळाच्या तिसऱया दिवशी मोठा विजय मिळवून दिला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ दुसऱयांदा गडगडला. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 188 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 303 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 115 धावांची आघाडी मिळविल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 155 धावांत आटोपल्याने इंग्लंडला विजयासाठी 271 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. इंग्लंडच्या मार्क वूडने 37 धावांत 6 गडी तर ब्रॉडने 51 धावांत 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियातर्फे कॅरेने 4 चौकारांसह 49, स्मिथने 4 चौकारांसह 27, ग्रीनने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. इंग्लंडच्या दुसऱया डावात पॅट कमिन्सने 42 धावांत 3 तसेच स्टार्कने 40 धावांत 1 गडी बाद केला. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर इंग्लंडने सिडनीची चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळविले. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत व्हाईटवॉश टाळला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव- 75.5 षटकांत सर्वबाद 303, इंग्लंड प.डाव – 47.4 षटकांत सर्वबाद 188, ऑस्ट्रेलिया दु. डाव- 56.3 षटकांत सर्वबाद 155, इंग्लंड दु. डाव- 38.5 षटकांत सर्वबाद 124 (क्रॉले 36, बर्न्स 26, मलान 10, रूट 11, वूड 11, कमिन्स 3-42, बोलँड 3-18. ग्रीन 3-21, स्टार्क 1-30).