माजी महापौर उदय मडकईकर निर्णयावर ठाम : तिसवाडीत अन्य चार ठिकाणी काँग्रेससाठीच कार्य : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /पणजी
माजीमहापौर उदय मडकईकर यांच्या भेटीसाठी महाराष्ट प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे गेले असता आपण पणजीत उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणार मात्र तिसवाडीत इतर सर्व ठिकाणी काँग्रेससाठी प्रचार कार्य करणार, असे स्पष्ट केले.
पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली. इतर पक्षांची ऑफर असूनदेखील मडकईकर हे काँग्रेस सोडून गेले नाहीत. पक्षासाठी आपण काम करणार, मात्र पणजीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस उमेदवार एल्विस गोम्स यांना मदत करणार नाही, असे मडकईकर यांनी या आगोदर जाहीर केले होते.
मडकईकर यांनी पणजीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी या संदर्भात आपला निषेध अशा पद्धतीने व्यक्त केला. तथापि मडकईकर यांची समजूत घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसने पाचारण केले. तथापि पणजीच्या संदर्भात आपण घेतलेल्या निर्णयाशी ठाम आहे आणि आपण उत्पललाच पाठिंबा देणार. या उलट तिसवाडीतील इतर चार मतदारसंघात मात्र काँग्रेससाठी कार्य करेन, असे मडकईकर यांनी स्पष्ट केले.