प्रतिनिधी/ सातारा
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार तिला मारहाण व शिवीगाळ करणाऱया आरोपी पतीने धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर जोरदार वार केला. व पाठलाग करून पुन्हा तिच्या हाताच्या दंडावर दोन वार करून तिचा खून केला. या खुनाप्रकरणी पती भारत कमलाकर जाधव (वय 27, रा. प्रतापगंज पेठ) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रतापगंज पेठ येथे राहत असलेला आरोपी भारत जाधव यांची दि. 27 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास पत्नीशी भांडणे झाली. यावेळी त्याने पत्नीच्या मानेवर धारदार कोयत्याने वार केला. जखमी अवस्थेत पत्नी रक्तबंभाळ अवस्थेत पहिल्या मजल्यावरून खाली येऊन रस्त्यावर बचावासाठी पळत असताना भारत याने पाठीमागून पाठलाग करून गाठले व पत्नीच्या उजव्या हाताच्या दंडावर दोन वार करून तिचा खून केला. त्यामुळे खूनचा गुन्हा पती भारत कमलाकर जाधव याच्यावर दाखल करण्यात आला होता. त्याच्या विरूद्ध पोलीस निरीक्षक के. एम. धुमाळ व पोलीस हवालदार श्रीनिवास देशमुख व अतिश घाडगे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यादरम्यान एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी निर्भीडपणे दिलेली साक्ष, परिस्थितीजन्य व शास्त्राsक्त पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस खुनाच्या आरोपाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.