प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य परिवहन कर्मचारी सहाव्या वेतन आयोग जारी करण्याच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे सोमवारी सलग 12 व्या दिवशीही परिवहनची बससेवा ठप्प होती. सरकारही भूमिकेवर ठाम असल्याने परिवहन कर्मचाऱयांनी सोमवारी बेंगळूरसह राज्यातील अनेक ठिकाणी ‘जेल भरो’ आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी काही संपकऱयांना अटक केली आहे.
बेंगळूरसह राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये परिवहन कर्मचाऱयांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ देण्याची मागणी करून आंदोलन छेडले. बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर सत्याग्रह करणाऱया कर्मचाऱयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन म्हैसूर रोडवरील सीएआर मैदानावर नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्यावर एफआयआर
परिवहन कर्मचाऱयांना भडकविल्याच्या आरोपावरून शेतकरी नेते व परिवहन कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्याविरुद्ध सोमवारी हलसूर गेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
समझोता झालेला नाही : सवदी
संपावर गेलेले परिवहन कर्मचारी व सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची समझोता बैठक झालेली नाही. याविषयी पसरलेली चर्चा ही केवळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिले आहे. संपाला प्रारंभ होण्याआधीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी परिवहन कर्मचाऱयांशी चर्चा किंवा समझोता करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.