जलाशयात 517.43 मीटर पाणीपातळी : 20 हजार 451 क्युसेक विसर्ग : 26 हजार 608 क्युसेक पाण्याची आवक
वार्ताहर /जमखंडी
यंदा जूनच्या मध्यावर 4 दिवस पाणलोट क्षेत्रात तसेच कृष्णाकाठावर मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे कृष्णेसह तिच्या उपनद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मान्सूनच्या दमदार सलामीमुळे आलमट्टी जलाशयाची ओव्हरफ्लो होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आलमट्टी जलाशयात 89.93 टीएमसी पाणीसाठा असून 517.43 मी. पाणीपातळी आहे. जलाशयात 26 हजार 608 क्युसेक पाण्याची आवक तर 20 हजार 451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दमदार पावसामुळे गत आठवडय़ात 1 लाख क्युसेकहून अधिक जलाशयात पाण्याची आवक सुरू होती. महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णेसह उपनद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनानेही पुराचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. हिप्परगी धरणातूनही दीड लाख क्युसेकपेक्षा अधिक येणाऱया आवकेबरोबरच तितकाच विसर्ग सुरू होता. दरम्यान 4 दिवसाच्या संततधार पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीपातळीत घट झाली.
प्रत्येकवर्षी आलमट्टी जलाशयात जुलै महिन्यात विद्युत उत्पादनासाठी विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात येतो. पण यंदा प्रवाह अधिक असल्याने 23 जूनपासून 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करून वीज उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्याने सोमवार दि. 28 रोजी जलाशयात 26 हजार 608 क्युसेक आवक तर 20 हजार 451 क्युसेक विसर्ग सुरू होता.
हिप्परगी धरण…
जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणात पाण्याची आवक घटली आहे. सोमवार दि. 28 रोजी येथील पाणीपातळी 521.6 मीटर होती. 22 हजार क्युसेक विसर्ग सुरू असून पाणीसाठा 3.1 टीएमसी इतका आहे. गतवर्षी 28 जून रोजी आलमट्टीत 515.25 मीटर पाणीपातळी तर 65.43 टीएमसी पाणीसाठा होता. तर 11 हजार 997 क्युसेक पाण्याची आवक होती. यंदा 2 पटीने आवक असून 15 टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान मान्सूनच्या पहिल्या पावसातच आलमट्टी ओव्हरफ्लो होण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होते.