प्रतिनिधी /मडगाव
आई -वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलाला अपघाती मृत्यू येण्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.प्राप्त माहितीनुसार अभिषेक कुमार हा सध्या फोंडा परिसरात एका कारखान्यात नोकरीला होता आणि फोंडा परिसरातच भाडय़ाच्या घरात राहात होता. मूळ उद्रार प्रदेशातील त्याचे पालक नेसाय येथे राहतात. आपल्या पालकांना भेटण्यासाठी म्हणून अभिषेक कुमार रविवारी सुट्टीचा दिवस पाहून नेसाय येथे आपल्या पालकाकडे आलेला.
पालकांकडे जेवण वगैरे करुन तो पुन्हा नेसायहून फोंडा येथे जाण्यासाठी जात होता. जाताना तो हेल्मेट विसरला. मुगाळी येथे पोहाचल्यावर आपण हेल्मेट विसरलेलो आहे याची कल्पना येताच तो थांबला आणि पुन्हा नेसाय येथे जाण्यासाठी दुचाकीवरुन वळला. इतक्यात…..
…..इतक्यात पाठीमागून येत असलेल्या दुसऱया एका दुचाकीची धडक, वळण घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या, अभिषेक याच्या दुचाकीला बसली आणि अभिषेक गंभीररित्या जखमी झाला. काही वेळाने त्याला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले तेव्हा ‘मृतावस्थेत आणल्या’चे डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी टिपण्णी केली.
ज्या दुचाकीने पुढील दुचाकीला धडक दिली होती ती दुचाकी हॅप्पी प्रधान हा 21 वर्षीय युवक चालवत होता. या अपघातात तोही गंभीररित्या जखमी झालेला असून त्याच्यावर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार चालू आहेत.
मायणा कुडतरी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मयताच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला असल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.