ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात गुरूवारी अजब प्रकार पहायला मिळाला. साहेब, मी दोन मिनिटांसाठी रस्त्यालगत गाडीवरच थांबलेलो आहे, मी गाडी नो पार्किंगमध्ये लावली नाही आहे. मी लगेचच जात आहे. कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असताना देखील टोईंग व्हॅन वर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले.
नो पार्किंगमध्ये बाईक उभी केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.