वृत्तसंस्था/ कौलालंपूर
कोरोना महामारी समस्येमुळे यापूर्वी अनेकवेळा लांबणीवर टाकण्यात आलेली पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा आता बांगलादेशमध्ये होणार आहे. सदर स्पर्धेचे यजमानपद बांगलादेश भूषविणार असून ही स्पर्धा ढाका येथे 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार असल्याची माहिती आशियाई हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे पुरुष आणि महिलांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा अनेकवेळा लांबणीवर टाकण्यात आली. लांबणीवर टाकण्यात आलेली ही स्पर्धा आता येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय फेडरेशनने जाहीर केला आहे. हिरो पुरस्कृत पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्याची ग्वाही बांगलादेशने दिली आहे. बांगलादेशमध्ये होणाऱया या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने अधिकृत मान्यता दिली आहे. या स्पर्धेमध्ये जपान, भारत, पाक, कोरिया, मलेशिया आणि यजमान बांगलादेश यांचा समावेश आहे.