उत्तर प्रदेशात रामपूर, आझमगडमध्ये फुलले कमळ ः पंजाब-संगरूरमध्ये ‘आप’ला धक्का
लखनौ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये रामपूर आणि आझमगडमध्ये भाजपने सपाचा पराभव केला आहे. रामपूरमध्ये भाजपचे उमेदवार घनश्याम सिंग लोधी यांनी सपा उमेदवार असीम रझा यांचा 42 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. आझमगडमध्ये भाजपचे उमेदवार दिनेशलाल यादव निरहुआ यांनी सपा उमेदवार धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत ‘शिरोमणी अकाली दल-अमृतसर’चे उमेदवार सिमरनजीत सिंग मान विजयी झाले आहेत. या जागेवर मान यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा पराभव केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जाणाऱया रामपूर मतदारसंघात सपाचे उमेदवार असीम राजा यांना परभावाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार घनश्याम सिंग लोधी यांनी असीम राजा यांचा पराभव केला. लोधी यांना 3,67,397 मते (51.96 टक्के), तर सपाच्या राजा यांना 3,25,205 मते (46 टक्के) मते मिळाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. रामपूरमध्ये भाजपने नुकतेच पक्षात दाखल झालेले घनश्याम सिंग लोधी यांना उमेदवारी दिली होती. तर, आझम खान यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर विश्वास दाखवला होता. बहुजन समाज पक्षाने (बसपा) रामपूरमधून निवडणूक लढवली नाही.
पूर्वी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या ताब्यात असलेल्या आझमगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिनेशलाल यादव निरहुआ यांनी सपा उमेदवार धर्मेंद्र यादव यांचा 8,679 मतांनी पराभव केला. भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांना 3,12,768 मते प्राप्त झाली. तर सपाचे धर्मेंद्र यादव यांना 3,04,089 आणि बहुजन समाज पार्टीच्या शाह आलम यांना 2,66,210 मते मिळाली. आझमगड पोटनिवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात होते.
योगी आदित्यनाथांनी मानले मतदारांचे आभार
रामपूर लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजपच्या सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचे सांगत राज्यातील जनतेचे आभार मानले. ‘पोटनिवडणुकीतील रामपूर लोकसभा जागेचा विजय हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली लोककल्याणकारी धोरणांवर दुहेरी इंजिन असलेल्या भाजप सरकारवर जनतेचा विश्वासाचा शिक्का आहे,’ असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले. हा विजय भाजपचे यशस्वी नेतृत्व, समर्पित कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि डबल इंजिन भाजप सरकारने स्थापन केलेल्या सुशासनाचे परिणाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘एसएडी-अमृतसर’ची संगरूरमध्ये बाजी
पंजाबमध्ये संगरूर लोकसभा मतदारसंघात ‘शिरोमणी अकाली दल-अमृतसर’च्या सिमरनजीत सिंग मान यांनी विजय मिळवला आले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजीनाम्यानंतर येथे निवडणूक झाली. ‘एसएडी-अमृतसर’च्या सिमरनजीत सिंग मान यांनी आपचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7 हजार मतानी पराभव केला. अधिकृत आकडेवारीनुसार सिमरनजीत सिंग मान यांना 2,53,154 मते मिळाली, तर गुरमेल सिंग यांना 2,47,332 मते मिळाली.
रविवारी सकाळपासून पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या अनेक फेऱयांमध्ये सिमरनजीत सिंग मान आणि आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी सिमरनजीत सिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा पराभव केला. अंतिम निकालानुसार काँग्रेस तिसऱया, भाजप चौथ्या आणि शिरोमणी अकाली दल (बादल) पाचव्या स्थानावर आहे. निवडणुकीत या तिन्ही पक्षांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. विजयी झालेले सिमरनजीत सिंग मान हे माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
लोकसभेत आता ‘आप’चा खासदार नाही!
संगरूर मतदारसंघातील ‘आप’च्या पराभवामुळे आता त्यांचा लोकसभेत एकही खासदार नाही. मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे लोकसभेत ‘आप’चे एकमेव खासदार होते. आम आदमी पक्षाने येथे विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर तीन महिन्यांनी पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.