आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमाचा भंग केल्याची यंदाची पहिलीच वेळ
अमेरिकेची गोळाफेकपटू रेव्हन साँडर्स हिला पोडियमवर नोंदवलेल्या निषेधामुळे शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे. हल्क या नावाने ओळखल्या जाणाऱया रेव्हनने गोळाफेकीत रौप्य जिंकल्यानंतर पोडियमवर हाताने एक्सची खूण केली. दुर्लक्षित, असहाय लोकांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने असे केल्याचे मानले जाते.
25 वर्षीय रेव्हन ही माध्यमिक प्रशालेत शिक्षण घेत असताना हल्क या टोपण नावाने ओळखली जायची. रविवारी ऑलिम्पिक स्टेडियमवर पदक वितरण सोहळय़ात तिने एक्स खूण करत आपला निषेध नोंदवला. रेव्हन ही कृष्णवर्णीय असून एलजीबीटीक्यू राईट्सचे ती समर्थन करीत आली आहे.
गोळाफेकीत रौप्य जिंकल्यानंतर रेव्हन पोडियमवर पोहोचली आणि तिथे पदक स्वीकारल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करताना आपल्या पद्धतीने निषेध नोंदवला. ऑलिम्पिक शिस्तपालन समितीच्या नियमानुसार, पोडियमवर असताना असे कोणतेही निषेध नोंदवता येत नाहीत. पण, रेव्हनने याचा भंग केला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याबाबत वर्ल्ड ऍथलेटिक्स, गोळाफेकीतील आंतरराष्ट्रीय संघटना, अमेरिकन ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक संघटना यांच्या संपर्कात असून पुढील 24 तासात कारवाईची दिशा स्पष्ट होऊ शकते.