कराड शहर पोलीस स्टेशनमधील प्रकाराने खळबळ
वार्ताहर / कराड
अदखलपात्र गुन्ह्य़ाच्या चौकशीकामी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या संशयिताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात त्यांच्याच समोर अर्जदारावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात किशोर पांडुरंग शिखरे (वय 27, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी, हजारमाची) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर लखन भागवत माने (वय 40, रा. हजारमाची) याला चाकूसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर शिखरे हा गवंडी कामाचा ठेकेदार आहे. तर लखन माने हा सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहे. लखन माने हा वारंवार फोन करून वडील व आपणाला धमकी देत असल्याबद्दल किशोर शिखरे व त्याच्या वडिलांनी 25 फेब्रवारी रोजी कराड शहर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याच्या चौकशीकामी सोमवारी तो कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता. लखन माने याने प्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची भेट घेऊन किशोर शिखरेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे बी. आर. पाटील यांनी अधिक चौकशी करण्यासाठी अर्जदार किशोर शिखरे यालाही शहर पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अर्जदार किशोर शिखरे त्याच्या अन्य नातेवाईकांसोबत बी. आर. पाटील यांच्या दालनात आला. त्याचवेळी लखन मानेही दालनात आला होता. बी. आर. पाटील अथवा नातेवाईक काही बोलायच्या आत लखन माने याने जर्कीनमध्ये लपवलेला चाकू काढून किशोर शिखरे याच्या छातीवर, पाठीत व दंडावर चाकूने वार केले. अचानक घडलेल्या प्रकाराने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीच तारांबळ उडाली. त्याचवेळी बी. आर. पाटील व पोलीस कर्मचाऱयांनी तात्काळ लखन माने यास पकडल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलिसांनी लखन माने यास चाकूसह ताब्यात घेतले आहे. तर किशोर शिखरे याला उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दुपारी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये त्यांच्या समोर घडलेल्या या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.