प्रतिनिधी/ सातारा :
एकमेकांवर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील सातारा तालुका पोलीस ठाण्यातच घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस ठाण्यातच खून झाल्याची हि जिह्यातील पहिलीच घटना असून या घटनेने पोलीस प्रशासनासह जिल्हा हादरुन गेला आहे.
दरम्यान, त्या दोघांमध्ये अगोदरच प्रेमप्रकरणातून वाद होते. त्यांच्या एकमेकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. त्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असताना पोलीस ठाण्यातच त्यांच्यात हा राडा झाला. घटनेनंतर पोलीस ठाण्यासह शहरात एकच थरकाप उडला. सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर, सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रामचंद्र (रामा) तुकाराम दुबळे (रा. मतकर कॉलनी शाहूपुरी ता. सातारा) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश कांबळे हा सैदापूर (ता. सातारा) येथे राहत असून त्याच ठिकाणी रामचंद्र दुबळे याची सासुरवाडी आहे. रामचंद्र दुबळे याची पहिली दोन लग्नग्न झाली आहेत. आता त्याचे दुसऱया एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेश कांबळे याच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामचंद्र दुबळेला माहिती दिली. त्यानंतर रामाने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहाण केली. तीन दिवसांपूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
गुरुवारी दोघांनाही दाखल तक्रारीमध्ये तालुका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश कांबळे हा आधीच तालुका पोलीस ठाण्यात आला होता. त्याने रामा दुबळे यास मारण्याच्या हेतूने सोबत कोयता आणला होता तर त्याबाबत कोणाला माहिती नव्हती. थोडय़ा वेळाने रामा दुबळेही पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यातच सुरेश कांबळेने रामा दुबळेवर पोलिसांसमोरच कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. एकमेकांवर हल्ला करत-करत दोघे पोलीस ठाण्याच्या बाहेरपर्यंत आले. यावेळी सुरेश कांबळेच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. रामा दुबळेने तोच कोयता उचलला आणि सुरेश कांबळेच्या डोक्यात, हातावर सपासप वार केले. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात रक्ताचा सडाच पडला होता.