फलटण / प्रतिनिधी :
कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर आणि जाधववाडी या 8 गावात दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित केले आहे. दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रांताधिकारी जगताप यांच्या आदेशानुसार संपूर्ण फलटण शहर आणि तालुक्यातील या 8 गावातील प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोर पालन आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून देत कोणीही घराबाहेर न पडता घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रात किराणा, दूध, फळे भाजीपाला घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेने खास अधिकाऱ्यांची वॉर्ड निहाय नियुक्ती केल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.