प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील गुहागरनाका येथे सापडलेल्या फार्मासिस्ट व त्याच्या शिक्षक पत्नीच्या संपर्कात तब्बल 127जण आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्या सर्वांचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. इतके लोक बाधितांच्या संपर्कात आल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याने येथे खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी दहा नव्या रूग्णांची भर पडल्याने तालुक्याचा आकडा आता 93वर गेला आहे. यातील 5 वयोवृध्द बाधितांचा मृत्यू झाला तर 73जण बरे होऊन घरी गेले आहेत. पेंढाबे येथील कोविड सेंटरमध्ये काहीजणांवर सध्या उपचार सुरू आहेत. काहीजण देखरेखीखाली व काहींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार दिवसांपूर्वी शहरातील गुहागरनाका येथील शबनम संकुलातील दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील पुरूष फार्मासिस्ट आहे व त्याची पत्नी शहरालगतच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका आहे. फार्मासिस्टच्या संपर्कात 68, तर शिक्षिकेच्या संपर्कात 59जण आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या 10 रूग्णांच्या संपर्कातही 25जण आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सर्वांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 120 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत ते येण्याची शक्यता आहे. येथे दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी प्रयत्न करत आहेत. आवश्यक त्याठिकाणी बंदी व फवारणी करण्याचे काम हाती घेतले जात आहे. तसेच ज्यांचा कोरोनाबाधितांशी संपर्क आला आहे. मात्र त्यांची नोंद झालेली नाही अशांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारपेठ बंदबाबत अफवा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद ठेवली जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र त्याबाबत वरिष्ठांनी कोणत्याही सूचना दिल्या नसून बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र सर्वांची सुरक्षितता म्हणून इतर तालुक्यांप्रमाणे व्यापाऱयांनी स्वत:हून काही दिवस बाजारपेठ बंद ठेवली तर त्यांचे स्वागतच असेल असेही सांगण्यात आले आहे.