वृत्तसंस्था / सावो पावलो
ब्राझिलचे माजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल सम्राट पेले यांनी शुक्रवारी 81 व्या वर्षात पदार्पण केले. ब्राझिलमधील त्यांच्या निवासस्थानी निवडक क्यक्तींच्या उपस्थितीमध्ये पेले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे वाढदिवसाचा समारंभ मोठय़ा प्रमाणात न करण्याचा निर्णय पेले यांनी घेतला होता. अलीकडच्या काही वर्षांमध्ये पेले यांना वारंवार आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पण 80 व्या वर्षातही ते पूर्वीसारखे ताजेतवाने आणि हसतमुख दिसत असल्याने त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अफवा खोटय़ा असल्याचे दिसून आले. ब्राझिल फुटबॉल कॉन्फडरेशनतर्फे पेले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेमध्ये ब्राझिलला तीन वेळा आपल्या उपस्थितीत विजेतेपद मिळवून देणारे पेले हे एकमेव फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात. 1958, 1962 आणि 1970 साली विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया ब्राझिल संघाचे प्रतिनिधित्व पेले यांनी केले होते. पेले यांच्या फुटबॉल क्षेत्रातील कामगिरीची नवोदित फुटबॉलपटूंना सदैव आठवण रहावी यासाठी ब्राझिल शासनातर्फे सावो पावलो फुटबॉल म्युझियम तयार केले जाणार आहे. 1955 साली आपल्या वयाच्या केवळ 15 व्या वषी पेले यांनी आपल्या व्यावसायिक फुटबॉल क्षेत्राला प्रारंभ केला होता. आपल्या फुटबॉल कारकीर्दीमध्ये त्यांनी आतापर्यंत 1281 गोल विविध आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदविले आहेत. 2000 साली फिफातर्फे फुटबॉल सम्राट पेले यांचा त्यांच्या फुटबॉल क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला होता आणि 20 व्या शतकातील ते जगातील सर्वात महान फुटबॉलपटू असल्याचे सांगण्यात आले होते. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू दियागो माराडोना 30 ऑक्टोबर रोजी 60 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.