प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील रायचूर जिल्हय़ातील मस्की आणि बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवारी पोटनिवडणूक पार पडली. मस्की मतदारसंघात मतदानाला मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोना परिस्थिती आणि तीव्र उन्हातही येथे 70.48 टक्के मतदान झाले. तर बसवकल्याणमध्ये केवळ 59.57 टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.
मस्की मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रतापगौडा पाटील आणि काँग्रेसचे बसवनगौडा तुर्विहाळ यांच्यात प्रमुख लढत होती. तर बसवकल्याण मतदारसंघामध्ये भाजपचे शरणू सलगर, काँग्रेसच्या मल्लम्मा आणि निजदचे सय्यद यस्रब अली काद्री यांच्यात तिरंगी लढत होती. येथील पोटनिवडणुकीचा निकालही 2 मे रोजी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बसवकल्याणमध्ये सकाळी 11 पर्यंत 19.48 टक्के तर मस्कीमध्ये 19.30 टक्के इतके मतदान झाले होते. तर दुपारी 3 वाजता दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 36.43 टक्के आणि 52.56 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी मात्र, चुरशीने मतदान झाले.