वार्ताहर / किणये
बस्तवाड (हलगा) येथील जिजामाता स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित हाफपीच क्रिकेट स्पर्धांना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धा सायंकाळी प्रकाशझोतात सुरू असून उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव चौगुले होते.
स्पर्धेचे उद्घाटन महांतेश हिरेमठ यांनी केले. यष्टीपूजन ग्राम पंचायत अध्यक्षा रेणुका गुडय़ापगोळ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मनोहर बांडगी, हनुमान प्रतिमा पूजन रामा काकतकर, जिजामाता फोटो प्रतिमेचे पूजन रमेश काकतकर यांनी केले.
रमेश मरगाण्णाचे, मनोहर मुचंडी, राजेंद्र बडवण्णवर, बाहुबली कामाल, संजय मरगाण्णाचे, गजानन काकतकर, विठ्ठल पाटील आदींनी दीपप्रज्वलन केले. मैदानाचे पूजन जोतिबा चौगुले यांनी केले. विजेत्या संघाला 25 हजार, उपविजेत्या संघाला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संघांना चषक देण्यात येणार आहे. मालिकावीर विजेत्याला 1501 रुपये, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस मंडळाकडून देण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी नूतन ग्राम पंचायत सदस्य सोनाली गणपत लोहार, सविता डी. पाटील, समीर सनदी, मल्लाप्पा दोड्डकल्लण्णावर, तवनाप्पा बडगेर, पद्मराज पाटील, भरमाप्पा गोंडकेंचाप्पगोळ, सुष्मा प्रकाश तेली आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी केले. हौशी संघांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी शेखर 7975947838 किंवा मनोज 7975817198 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.