120 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होणार : राज्याला प्रथमच रेल्वेने होतोय ऑक्सिजन पुरवठा
प्रतिनिधी /बेंगळूर
केंद्र सरकारने विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ रेल्वे सुरु केली आहे. कर्नाटकात पहिली ऑक्सिजन रेल्वे मंगळवार दि. 11 मे रोजी येणार आहे. सुमारे 120 मेट्रीक टन द्रवरुप ऑक्सिजन टँकरची वाहतूक करणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी जमशेदपूरहून बेंगळूरकडे मार्गस्थ झाली. ती मंगळवारी बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड येथे दाखल होणार आहे.
गुजरातहून सोमवारी निघालेली आणखी एक ऑक्सिजन एक्स्पेस दिल्लीला पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली असून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादन होणाऱया कंपन्यांमार्फत केंद्र सरकार विविध राज्यांना मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा करत आहे. जलद वाहतुकीसाठी रेल्वेचा आधार घेतला जात आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत 4,200 मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन 268 टँकरने देशभरात पुरवठा केला आहे.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 68 रेल्वेंनी ऑक्सिजन वाहतुकीचा प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्राला 293 मे. टन, उत्तर प्रदेशला 1,230 मे. टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. मध्यप्रदेशला 271 मे. टन, हरियाणाला 555 मे. टन, तेलंगण राज्याला 123 मे. टन आणि दिल्लीला 1,679 मे. टन ऑक्सिजन रेल्वेद्वारे पुरवठा करण्यात आला आहे.
नवमंगळूर बंदरावर कुवेतहून 40 टन ऑक्सिजन दाखल
भारतीय नौदलाने केंद्र सरकारच्या सूचनेवरून ‘ऑपरेशन समुद्र सेतू-2’ या मोहिमेंतर्गत विदेशातून ऑक्सिजन, औषधे व वैद्यकीय उपकरणे आणण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी कुवेतहून 40 टन ऑक्सिजन असणारे कंटेनर आयएनएस कोलकाता या नौकेतून नवमंगळूर बंदरावर आणण्यात आले. आमदार डॉ. वाय. भरत शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद के. व्ही. आणि इतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत आयएनएस कोलकाता नौकेतून आलेला ऑक्सिजनसाठा स्वीकारण्यात आला. कुवेत सरकारने दोन कंटेनरमधून वैद्यकीय ऑक्सिजन, तसेच 400 सिलिंडर्स आणि 47 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पुरवठा केला आहे. एक जहाज सोमवारी आले असून आणखी दोन जहाजे मंगळवारी दाखल होण्याची शक्यता आहे.