बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सीसीबीने ड्रग रॅकेट प्रकरणी मंगळवारी सकाळी कन्नड फिल्म इंडस्ट्रीत मोठी कारवाई केली आहे. कन्नड चित्रपट अभिनेत्री संजना गलराणी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणी पोलीस तिच्या घरची झाडा झडती घेत आहेत. संजनाने कन्नडसह तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कारवाई विषयी बोलताना गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर सकाळी ही कारवाई केली जात असल्याचे म्हंटले आहे.
या प्रकरणात सीसीबीने आतापर्यंत चित्रपट अभिनेत्री रागिनी द्विवेदीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. केरळ येथील नियाझला पोलिसांनी सोमवारी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली. या प्रकरणात रविशंकर, राहुल, वीरेन खन्ना, लूम पेपर सांबा यांनाही अटक करण्यात आली आहे.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार नियाज हा केरळचा आहे पण तो गेल्या पाच वर्षांपासून बेंगळूरमध्ये राहत होता.
काही दिवसापूर्वी चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश यांनी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मादक पदार्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप लावून सॅण्डलवूडमध्ये दहशत निर्माण केली होती. ते म्हणाले होते की चित्रपट उद्योगातील किमान १५ लोक मादक पदार्थांच्या व्यापात गुंतले आहेत. तो सीसीबीसमोर हजर झाला होता आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सच्या तस्करीच्या आरोपावरून त्याची अनेक तास चौकशी झाली होती.