केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी युवराज स्पोर्ट्स क्लबने चॅलेंजर निपाणी संघाचा 12 धावांनी तर बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने हिंडाल्को क्रिकेट क्लब सी संघाचा 3 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. आकाश कुलकर्णी (बीएससी), किरण तारळेकर, युवराज यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर हिंडाल्को स्पोर्ट्स क्लब संघाने 29 षटकात सर्वबाद 170 धावा केल्या. भरत गाडेकरने 2 षटकार, 5 चौकारासह 53, राजू मानेने 48, पवन हुबळीने 32, सुनील गुरवने 12 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आकाश कुलकर्णीने 16 धावात 3, हर्ष पटेलने 28 धावात 2, प्रमोद पालेकरने 30 धावात 2, अथर्व नुली व सचिन हुंबरवाडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने 30 षटकात 7 बाद 173 धावा करून सामना 3 गडय़ांनी जिंकला. आकाश कुलकर्णीने 39, नतुष धुमाले 34, समीर नाईकने 21, हर्ष पटेलने 16, आशुतोष हिरेमठने 14 धावा केल्या. हिंडाल्कोतर्फे सुनील पाटील व राम नाईक यांनी प्रत्येकी 21 धावात 2 तर सुनील गुरवने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात युवराज स्पोर्ट्स क्लबने 24.2 षटकात सर्वबाद 110 धावा केल्या. कल्पेश एस.ने 34, किरण तारळेकरने 21, अनुराग पाटील, विनायक देवन यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. चॅलेंजर निपाणीतर्फे विनायक कांबळेने 19 धावात 3, गौस पटेलने 16 धावात 2, अभि संधाडेने 12 धावात 2, सुर्याने 30 धावात 2, राजू करोशीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर निपाणीचा डाव 25 षटकात सर्व बाद 98 धावात आटोपला. शुभम नागेशने 31, गौस पटेलने 16, ओम इनामदारने 11 धावा केल्या. युवराजतर्फे किरण तारळेकरने 23 धावात 2, जोतिबा गिलबिलेने 15 धावात 2, अनुराग पाटील, मोलवी व कल्पेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.