31 ऑक्टोबरपर्यंत मुदत- त्यानंतर होणार वाहनांचा लिलाव
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी व एका चारचाकी वाहनासह एकूण 94 वाहने बेवारस स्थिती आढळून आली असून ती पोलीस ठाण्याच्या परिसरात आहेत. या वाहनांची मालकी कागदपत्रांसह सिध्द करुन ती 31 ऑक्टोबरपर्यंत न्यावीत, अन्यथा त्यानंतर शासन नियमानुसार या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सातारा शहर पेलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना आतापर्यंत 93 दुचाकी व एक चारचाकी कार अशी 94 वाहने शहर व परिसरात बेवारस स्थिती मिळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात लावलेली आहेत. यातील अनेक वाहनांना खूप दिवस होवून त्यांचा मालकी हक्क सिध्द करण्यास कोणीही आलेले नाही.
या वाहनांचे क्रमांक व यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात उपलब्ध आहे. या माहितीनुसार ज्यांना या वाहनांची मालकी सिध्द करायची आहे त्यांनी मूळ कागदपत्रांसह दि. 31 ऑक्टोबरपर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात यावे मालकी सिध्द करुन वाहने घेवून जावीत. या मुदतीनंतर कोणी आल्यास वाहनांच्या मालकीबाबत हक्क ग्राहय़ धरण्यात येणार नाही. या बेवारस वाहनांचा स्क्रॅप म्हणून कायदेशीर लिलाव करण्यात येणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.