शस्त्राचा धाक दाखवत झाडीत नेऊन लुबाडले,
प्रतिनिधी/ सातारा
सदरबाझार येथील समाजकल्याण ऑफिस समोरील पुलावर एका अज्ञात व्यक्तीने बेशुद्ध होण्याचे सोंग घेत झोपलेल्या चोरटय़ाच्या मदतीला धावणाऱया दुचाकीस्वारालाच शस्त्राचा धाक दाखवत आडबाजूला झाडीमध्ये नेत साथीदाराच्या मदतीने लुटले. साताऱयात लुटमारीचा हा नवाच प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सदरबझार येथील समाजकल्याण ऑफिससमोरील पुलावर 20 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला होता. यावेळी फिर्यादी वनराज शिवाजीराव कुमकर (वय 55 रा. शनिवार पेठ) हे दुचाकीवरून सदरबझारच्या दिशेने निघाले होते. यावेळी समाजकल्याण ऑफिससमोर पोहचताच त्यांना अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. यामुळे त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी हा व्यक्ती उठला आणि त्याने व त्याच्या एका साथीदाराने वनराज कुमकर याना पकडले. बाजुला असणाऱया झाडीत घेवून गेले. यावेळी धारदार शस्त्र मानेला लावून त्याच्या जवळील 10 हजार 520 रूपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम, चार पेनड्राईव्ह असे साहित्य चोरून पलायन केले.
या घटनेमुळे घाबरलेल्या वनराज कुमकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल केला. या गुह्याचा अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक श्रीसुंदर करत आहेत.
मदत करणेही झाले जीवघेणे शस्त्राचा धाक दाखवून अशा पद्धतीने लुटण्याची साताऱयातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे लोकांच्या मनात भीती आणि संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे मदत करायची की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांना प्रवासादरम्यान खरंच मदतीची गरज असते, त्यांना वेळेवर मदत मिळत नाही.