उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून ‘शुभसंकेत’- दहशतवादाच्या मुद्दय़ावरून पाकिस्तानला फटकारले, भारताला देणार साथ
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी भारतात वेगाने सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावर आनंद व्यक्त केला. तसेच जगभरातील इतर देशांना लसपुरवठा केल्याबद्दलही भारताचे विशेष कौतुक करत कोरोना संसर्ग रोखण्यात भारताचे योगदान बहुमूल्य असल्याचे नमूद केले. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय चर्चेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूने भारत-अमेरिका संबंध आणखी घट्ट करण्यावर जोर देण्यात आला. तसेच या चर्चेवेळी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हॅरिस यांनी पाकिस्तानला कडक शब्दात फटकारत दहशतवादाच्या मुद्दय़ावर भारताला साथ देण्याची तयारी दर्शवली आहे.
नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस या दोन्ही नेत्यांच्या भेटीत लोकशाहीच्या मुद्यावर सविस्तरपणे चर्चा झाली. कमला हॅरिस यांनी कोणत्याही देशाचा उल्लेख न करता जगात लोकशाही धोक्मयात आली असताना भारताने अमेरिकेला साथ देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सकारात्मक परिणामासाठी भारताचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे हॅरिस म्हणाल्या. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पुरवठा साखळी आणि नवीन तंत्रज्ञान आदी मुद्दे भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले. तसेच भारत आणि अमेरिकेचे संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनास्थितीवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात झालेल्या बैठकीत कोरोना महासाथीच्या आजारावर चर्चा झाली. कमला हॅरिस यांनी कोरोना संकटात अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या मदतीचा उल्लेख करत कठिण काळात अमेरिकेने भारताला मदत केली असल्याचे म्हटले. भारतात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना आम्ही आवश्यक ती मदत करू शकलो याचे समाधान आहे. करोना लसीकरणातही आम्ही मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अमेरिकेने केलेल्या मदतीचा उल्लेख करत अमेरिका चांगला मित्र असल्याचे म्हटले. अमेरिकेने केलेली मदत ही एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणेच होती असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
भारत भेटीचे आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले असून त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. ‘भारतातील लोक तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत,’ अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले. तसेच कमला हॅरिस यांचे कौतुक करत आपण अमेरिकेचे उपराष्ट्रपती होणे ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.
ऑस्ट्रेलिया, जपान पंतप्रधानांशी ‘सहकार्या’संबंधी चर्चा
अमेरिका दौऱयावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत वाणिज्य, व्यापार, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मॉरिसन आपले मित्र असल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत चर्चेचा नेहमीच चांगला अनुभव येतो, असे मोदी म्हणाले. या दौऱयात मोदींनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबतही चर्चा केली. जपान भारताच्या सर्वात महत्त्वाच्या भागिदारांपैकी एक आहे. जपानचे पंतप्रधान सुगा यांच्यासोबतच्या चर्चेत दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला. भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य जगासाठीही चांगले ठरतील, असे मोदी बैठकीनंतर म्हणाले.