पाकिस्तान, बांगलादेश, अफगाण संघ बाद फेरीमध्ये दाखल
वृत्तसंस्था / तेरोबा (त्रिनिदाद)
आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या ब गटातील सामन्यात रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दुबळय़ा युगांडाचा 326 धावांनी दणदणीत पराभव केला. ब गटात भारतीय संघाने आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील अन्य सामन्यात पाकिस्तानने तसेच विद्यमान विजेता बांगलादेश व अफगाण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकांत 5 बाद 405 धावा जमविल्या. त्यानंतर युगांडाचा डाव 19.4 षटकांत केवळ 79 धावांत आटोपल्याने भारतीय युवा संघाने या स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय (326 धावांनी) नोंदविला. ऋषीकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय युवा संघाने प्राथमिक गटातील आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून बाद फेरीत स्थान मिळविले आहे. भारताने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी तर दुसऱया सामन्यात आयर्लंडचा 174 धावांनी पराभव केला होता.
शनिवारच्या सामन्यात भारतीय संघातील रघुवंशीने 120 चेंडूत 4 षटकार आणि 22 चौकारांसह 144 तर राज बावाने 108 चेंडूत 8 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 162 धावा झोडपल्या. रघुवंशी आणि बावा यांनी तिसऱया गडय़ासाठी 206 धावांची भागिदारी केली. भारताच्या या फलंदाजांनी मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. या स्पर्धेतील भारताची ही विक्रमी दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. कोरोना महामारी समस्येमुळे कर्णधार यश धुलसह अन्य काही क्रिकेटपटूंना या सामन्यात खेळता आले नाही. भारतीय युवा संघाने यापूर्वी चारवेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.
2004 साली या स्पर्धेत भारताने स्कॉटलंडविरूद्ध 3 बाद 425 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत विश्वविक्रम नोंदविला आहे. 2002 साली ऑस्ट्रेलिया युवा संघाने या स्पर्धेत केनियाविरूद्ध 6 बाद 480 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली होती. भारतातर्फे शतकवीर बावाने या स्पर्धेच्या इतिहासामध्ये वैयक्तिक सर्वोच्च (नाबाद 162) धावा जमविताना 2004 साली या स्पर्धेत भारतातर्फे सलामीच्या शिखर धवनने स्कॉटलंडविरूद्ध नोंदविलेला नाबाद 155 धावांचा विक्रम मागे टाकला. शनिवारच्या सामन्यात भारताच्या डावात युगांडाच्या मुरूंगीने 72 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युगांडाचा डाव 19.4 षटकांत 79 धावांत आटोपला. युगांडा संघातील पास्कल मुरूंगीने 34 धावा जमविल्या. भारतीय संघातर्फे निशांत सिंधूने 19 धावांत 4 तर राजवर्धन हंगरगेकरने 8 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात धुलच्या गैरहजेरीत निशांत सिंधूकडे कर्णधाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत- 50 षटकांत 5 बाद 405 (राज बावा नाबाद 162, रघुवंशी 144, पी. मुरूंगी 3-72), युगांडा- 19.4 षटकांत सर्वबाद 79 (पी. मुरूंगी 34, निशांत सिंधू 4-19, राजवर्धन हंगरगेकर 2-8, वत्स 1-18).
पाकचा विजय
क गटातील सामन्यात पाकने पापुआ न्यूगिनीयाचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून बाद फेरीत प्रवेश मिळविला. पाक संघाने क गटातील आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून आघाडीचे स्थान घेतले आहे. आता पाकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पापुआ न्यूगिनियाचा पुढील सामना प्लेट लीग विभागात यजमान विंडीजबरोबर होणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यूगिनियाचा डाव 50 धावांत आटोपला. या संघातील किलापेट आणि रे यांनी सलामीच्या गडय़ासाठी 24 धावांची भागिदारी केली. किलापेटने 11 धावा जमविल्या. ही जोडी फुटल्यानंतर पापुआ न्यूगिनियाचे उर्वरित 9 गडी 26 धावांत तंबूत परतले. या संघाच्या 50 धावांच्या धावसंख्येत 19 अवांतर धावांचा समावेश आहे. पाकच्या मोहम्मद शेहजादने 7 धावांत 5 गडी बाद केले. अहमद खानने 10 धावांत 3 गडी बाद केले. पापुआ न्यूगिनियाच्या शेवटच्या 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकचा सलामीचा फलंदाज शेहजाद खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर अबास अली आणि यष्टीरक्षक हसीबुल खान यांनी आपल्या संघाला 9 गडय़ांनी विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक ः पापुआ न्यूगिनिया सर्वबाद 50 (किलापेट 11, शेहजाद 7-5, अहमद खान 3-10), पाक 1 बाद 51.
बांगलादेश बाद फेरीत
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात विद्यमान विजेत्या बांगलादेशने संयुक्त अरब अमिरातचा 9 गडय़ांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातचा डाव 148 धावांत आटोपला. पुन्य मेहराने 64 चेंडूत 43 धावा जमविल्या. कर्णधार शेराफु आणि ध्रृव पराशर यांनी तिसऱया गडय़ासाठी 44 धावांची भागिदारी केली. संयुक्त अरब अमिरातचे शेवटचे सात गडी 98 धावांत बाद झाले. बांगलादेशतर्फे रिपॉन मुंडलने 31 धावांत 3 तर झमानने 14 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने आपल्या डावाला दमदार सुरूवात केली. त्यांच्या सलामीच्या जोडीने 86 धावांची भागिदारी केली. इफ्तिकार हुसेनने 70 चेंडूत 37 तर एम. इस्लामने 45 धावा झळकविल्या. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी बांगलादेशला विजयासाठी 107 धावांचे नवे उद्द्ाrष्ट दिले. बांगलादेशच्या माफिझुलने अर्धशतक झळकविले. तो 64 धावांवर नाबाद राहिला. आता बांगलादेश आणि भारत यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. युगांडा आणि युएई यांच्यात प्लेट उपांत्यपूर्व फेरीतील सलामीचा सामना होईल.
अफगाणची झिम्बाब्वेवर मात
शनिवारी क गटातील झालेल्या अन्य एका सामन्यात अफगाणने झिंबाब्वेचा 109 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. अफगाण आणि लंका यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. अफगाणने 50 षटकांत 6 बाद 261 धावा जमविल्या. अफगाणचा कर्णधार सुलीमान सेफीने 118 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 111 धावा झळकविल्या. त्यानंतर अफगाणच्या अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचा डाव 152 धावांत आटोपला. झिंबाब्वेच्या वुलहुटेरने 52 चेंडूत 28 वेल्चने 61 चेंडूत 53 धावा झळकविल्या. खेरोटेने 30 धावांत 4 गडी बाद केले.