3 सामन्यांची टी-20 मालिका 2-0 फरकाने जिंकली – श्रेयस अय्यरचे धडाकेबाज अर्धशतक
वृत्तसंस्था/ धर्मशाला
श्रेयस अय्यर (44 चेंडूत नाबाद 74), संजू सॅमसन (25 चेंडूत 39) व रविंद्र जडेजाच्या (18 चेंडूत नाबाद 45) धमाकेदार फलंदाजीच्या बळावर भारताने दुसरी टी-20 लढत तब्बल 7 गडी राखून जिंकत लंकन संघाला आणखी एक सणसणीत चपराक दिली. लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 183 धावांचा डोंगर रचल्यानंतर भारताने देखील तोडीस तोड उत्तर देत अवघ्या 17.1 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 184 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा (1) पहिल्याच षटकात बाद झाला. इशान व श्रेयस यांनी 35 धावांची भागीदारी केली. मात्र, लहिरु कुमाराने इशानला सहाव्या षटकात बाद केले. श्रेयस व संजू सॅमसन यांनी त्यानंतर धडाकेबाज फलंदाजीवर भर देत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. सॅमसन 13 व्या षटकात बिनुराच्या एकहाती अप्रतिम झेलामुळे तंबूत परतला, त्यावेळी भारताची 3 बाद 128 अशी स्थिती होती. त्यानंतर जडेजा व श्रेयस यांनी मात्र सहजपणे चौफेर फटकेबाजी करत लंकन गोलंदाजांमधील हवाच काढून घेतली. या जोडीने अवघ्या 25 चेंडूत 58 धावांची भागीदारी साकारत संघाचा दणकेबाज विजय साकारला.
तत्पूर्वी, कर्णधार दसून शनाकाचा 19 चेंडूतील 47 धावांचा झंझावात आणि सलामीवीर पथूम निस्सांकाच्या 53 चेंडूतील सर्वोच्च 75 धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकन संघाने 20 षटकात 5 बाद 183 धावांची जोरदार मजल मारली होती. सलामीवीर निस्सांकाने प्रारंभी गुणथिलकासमवेत 8.4 षटकात 67 धावांची सलामी दिली.
निस्सांकाच्या 75 धावांच्या खेळीत 11 सणसणीत चौकारांचा समावेश राहिला. शनाकाने 5 उत्तुंग षटकार व 2 चौकार वसूल केले होते. उभय संघातील तिसरी व शेवटची टी-20 आज (रविवार दि. 27) होणार आहे.
धावफलक
श्रीलंका ः पथूम निस्सांका पायचीत गो. भुवनेश्वर 75 (53 चेंडूत 11 चौकार), दनुष्का गुणथिलका झे. वेंकटेश, गो. जडेजा 38 (29 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), चरिथ असलंका पायचीत गो. चहल 2 (5 चेंडू), कमिल मिशरा झे. वेंकटेश, गो. पटेल 1 (4 चेंडू), दिनेश चंडिमल झे. शर्मा, गो. बुमराह 9 (10 चेंडूत 1 चौकार), दसुन शनाका नाबाद 47 (19 चेंडूत 2 चौकार, 5 षटकार), करुणारत्ने नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 5 बाद 183.
गडी बाद होण्याचा क्रम
1-67 (गुणथिलका, 8.4), 2-71 (असलंका, 9.5), 3-76 (कमिल 10.6), 4-102 (चंडिमल, 14.4), 5-160 (निस्सांका, 18.6).
गोलंदाजी ः भुवनेश्वर 4-0-36-1, बुमराह 4-0-24-1, हर्षल 4-0-52-1, चहल 4-0-27-1, जडेजा 4-0-37-1.
भारत ः रोहित त्रि. गो. चमीरा 1 (2 चेंडू), इशान किशन झे. शनाका, गो. कुमारा 16 (15 चेंडूत 2 चौकार), श्रेयस अय्यर नाबाद 74 (44 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), सॅमसन झे. फर्नांडो, गो. कुमारा 39 (25 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 45 (18 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार). अवांतर 11. एकूण 17.1 षटकात 3 बाद 186.
गडी बाद होण्याचा क्रम
1-9 (रोहित, 0.6), 2-44 (इशान, 5.1), 3-128 (सॅमसन, 12.6).
गोलंदाजी ः चमीरा 3.1-0-39-1, बिनुरा 4-0-47-0, लहिरु 3-0-31-2, जयविक्रमा 2-0-19-0, करुणारत्ने 3-0-24-0, शनाका 2-0-24-0.